Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeगाव-सहेलीकाश्मीरच्या सीमेवरील "गुरेझ" बनले पर्यटकांचे आकर्षण...
spot_img
spot_img

काश्मीरच्या सीमेवरील “गुरेझ” बनले पर्यटकांचे आकर्षण…

 

 

 

श्रीनगर – काश्मीरची ‘हसीन वादिया’ पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी देश-परदेशातून पर्यटक येथे येत असतात. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहेलगाम या पारंपरिक पर्यटनस्थळांप्रमाणेच आता उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ खोऱ्यात गर्दी होत आहे.

 

श्रीनगरपासून १३० किलोमीटरवरील अंतरावरील गुरेझ खोरे ११ हजार ८०० फूट उंचीवर आहे. राझदान खिंडीलाही येथूनच जावे लागते. थंड हवा आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या सान्निध्यात ताजेतवाने झाल्याचा अनुभव येतो. अधिकृत आकडेवारीनुसार सध्या दररोज सुमारे ५०० ते ६०० पर्यटक गुरेझ खोऱ्याला भेट देतात. नियंत्रण रेषेजवळ असल्याने पर्यटकांमध्ये या स्थळाबाबत कुतूहल असते.

 

मुंबईहून येथे आलेला एक पर्यटक म्हणाला की, आमची ही पहिलीच काश्मीर भेट आहे. यूट्यब आणि गुगलवर पाहिल्याप्रमाणे काश्‍मीर खरोखर स्वर्ग आहे. त्यातही गुरेझ खोऱ्याची सैर करणे हे एक आकर्षण होते. हैदराबादमधील एका पर्यटकाने सांगितले की, थंड हवेच्या ठिकाणांचा शोध घेताना आम्हाला गुरेझची माहिती मिळाली. मंत्रमुग्ध करणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य पाहण्यात आम्ही तासनतास घालवले. प्रत्यक्ष बर्फ पाहण्याचे स्वप्न सत्यात उतरले.

 

गोळ्यांचा आवाज ते शांतता

नियंत्रण रेषेजवळ असल्याने गुरेझ खोऱ्यात सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि तणावाची स्थिती कायम असे. पण आता हा इतिहास बदलला असून पर्यटकांना आकर्षित करणारे हे आणखी एक पर्यटन स्थळ बनले आहे. नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या या खोऱ्यात आता ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि मासेमारी आदी सुविधा उपलब्ध आहेत. या सकारात्मक बदलांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही समाधान आहे.

 

या प्रदेशात पर्यटनाला चालना देण्याचे श्रेय ते भारतीय लष्कर, स्थानिक समुदाय आणि सरकारला देतात. गुरेझमध्ये पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी गुरेझ खोऱ्यात वीज पोहोचली.

 

विजेच्या पुरवठ्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे दर्द- शिना जमातीला समर्पित केलेले ‘शिनॉन मीराज’ या सांस्कृतिक केंद्राच्या रूपाने या प्रदेशातील वारसा जतन करण्यात आला आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page