महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर शनिवारी मूर्तिजापूरकरात
” खेळ मांडियेला ” डॉ. सुगत वाघमारे यांच्या तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम
मूर्तिजापूर – तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी द्वारे महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला कार्यक्रम शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी नगर येथील लाल शाळेच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्वदूर परिचित आहे. सर्व महिलांचे भाऊजी आदेश बांदेकर आपल्या सर्वच वाहिनीसाहेबांना भेटण्यासाठी येत आहेत. आपल्याला मूर्तिजापुरात खेळ मांडीयेला या खेळात सहभागी व्हायचे आहे, अशी माहीती तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी दिनांक १९ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की,रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता-भगिनींना चार क्षण विरंगुळा मिळावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अक्षरशः वेड लावले आहे. आजपर्यंत विविध ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून, प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते. मनोरंजनासोबतच ज्ञानप्राप्ती करून देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे व या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुगत वाघमारे यांनी केली. यावेळी श्रीकांत पिंजरकर, विष्णुदास मोंडोकार, अजित रामचंद्र व जया भारती उपस्थित होते.