नांदेड : नांदेड तालुक्यातील नेरली कुष्ठधाम येथे दूषित पाणी पिल्याने दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्यासह चक्कर व डोकेदुखी होऊ लागली. अचानक मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडल्याने त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. ही विषबाधा सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
नांदेड जवळच असलेल्या नेरली कुष्ठधाम येथे शुक्रवारी मध्यरात्री गावातील काही महिला आणि पुरुषांना उलटी जुलाब होणे, डोके दुखणे, चक्कर येणे असा प्रकार होत असल्याने त्यांना रात्री साडेबारा वाजल्यापासून नांदेड शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात भरती केले जात आहे. आज शनिवार पहाटे चार वाजेपर्यंत तब्बल २०० रुग्णांना नांदेडच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये लहान मुळे, महिला आणि वृद्ध नगरिकांचा समावेश आहे.
आजारी व्यक्तींच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी डॉक्टरांच्या टीमसह नेरली कुष्ठधाम येथे धाव घेतली. रात्रीपासून आरोग्य पथक गावात तळ ठोकून असून गावातील अस्वस्थ रुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे.
सहा जणांची प्रकृती गंभीर
या घटनेत सहा जणांची प्रकृती ही गंभीर आहे. या सर्वांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय ग्रामस्थानी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील या घटनेची माहिती घेतली असून आरोग्य यंत्रणेला योग्य त्या उपाय योजना करण्यास सांगण्यात आले आहे.