#Akola #journalist | अकोल्यातील पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला…
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावचे रहिवाशी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान विवरा येथे प्राणघातक हल्ला करण्यात आलेला असून त्यात ते सुदैवाने बचावले असून त्यांच्यावर अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार करण्यात आले असून शरीरावर बऱ्याच ठिकाणी मुका मार लागलेला आहे.अगदी रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना उपचारासाठी त्यांच्या चारचाकी वाहनाच्या चालकाने त्यांना अकोल्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी अकोल्यातील अनेक वरिष्ठ पत्रकार गेले होते.त्यांनी त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेवून एका निधड्या छातीच्या पत्रकारावर झालेल्या पूर्वनियोजित हल्ल्याची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
पत्रकार मुर्तडकर यांच्यावर झालेला हल्ला हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यांना जीव मारण्यासाठी गोडी गुलाबीने विवरा येथे बोलावण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यांनी प्रकाशित केलेल्या “अपराध जगतातील” माफियांच्या बातम्या व गेल्या काही दिवसांत पोलिस विभागातील बड्या लोकांशी घेतलेला “पंगा” ह्या प्रकारातून झाल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.
ह्या हल्ल्याचा निषेध करून आरोपींना कठोर शासन होण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांचे शिष्टमंडळ जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी करणार आहे.